‘Nano Banana’ ट्रेंडचा मोह धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

13 Sep 2025 14:25:16
 
Nano Banana trend
 (Image Source:Internet)
 
सोशल मीडियावर दर काही दिवसांनी नवे-नवे व्हिज्युअल ट्रेंड्स लोकप्रिय होत आहेत. काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘Ghibli ट्रेंड’ नंतर आता ‘Nano Banana’ नावाचा नवीन AI फोटो ट्रेंड तरुणाईला वेड लावत आहे. वापरकर्ते या टूलद्वारे आपले हटके, 3D मॉडेलसारखे फोटो तयार करून व्हायरल करत आहेत. मात्र, या रंगीत-गमतीदार दिसणाऱ्या ट्रेंडमागे गंभीर सायबर धोक्याचे सावट असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
 
धोका नेमका कसा आहे?
सायबर अवेअरनेस फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य प्रमुख व सायबर क्राईम तज्ज्ञ धनंजय देशपांडे यांच्या मते, ‘Nano Banana’ वापरण्यासाठी मोबाईल गॅलरी, ईमेलसह अनेक महत्त्वाच्या परवानग्या मागितल्या जातात. या परवानग्या दिल्यानंतर तुमचे खासगी फोटो, वैयक्तिक डेटा आणि मेल्स थेट टूलच्या सर्व्हरवर पोहोचतात.
 
एकदा गॅलरीतील माहिती हॅकर्सच्या हाती गेली की फोटो लीक होणे, मॉर्फिंग, फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंग यांसारखे गंभीर धोके उद्भवू शकतात. देशपांडे यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी ‘Ghibli ट्रेंड’ मुळे अनेकांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. अगदी तसाच धोका या नव्या ट्रेंडमध्येही आहे.
 
ब्लॅकमेलिंगचा वाढता धोका-
तज्ज्ञांच्या मते, हॅकर्स वापरकर्त्यांचे फोटो एडिट करून त्यांना अश्लील किंवा खोट्या स्वरूपात पसरवू शकतात. त्यानंतर पैशांची मागणी करून ब्लॅकमेलिंगही केली जाते. यातून केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक ताण आणि सामाजिक प्रतिष्ठेवरही मोठा परिणाम होतो.
 
नागरिकांनी काय करावे?
कुठलाही व्हायरल ट्रेंड आंधळेपणाने फॉलो करू नका.
अनोळखी किंवा थर्ड-पार्टी टूल्स डाऊनलोड करण्यापूर्वी त्यांचा स्रोत व सुरक्षितता तपासा.
अनोळखी अॅप्सना गॅलरी किंवा ईमेल अॅक्सेस देणे टाळा.
आपल्या मित्रपरिवारालाही या धोक्यांबाबत जागरूक करा.
 
सावधानतेचा संदेश-
‘Nano Banana’ सारखे ट्रेंड्स प्रथमदर्शनी आकर्षक व मजेदार वाटतात. पण या आकर्षणाच्या आड सायबर गुन्हेगारांचे जाळे दडलेले असते. केवळ थोड्या मनोरंजनासाठी आपल्या सुरक्षेचा बळी देऊ नका, असा स्पष्ट सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0