- एका मुलीची प्रकृती गंभीर
(Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील मनकापुर फ्लायओव्हरवर (Mankapur flyover) शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण अपघात झाला. शाळेची व्हॅन आणि शाळेची बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. धडक एवढी भीषण होती की शाळेच्या व्हॅनचे अक्षरशः चुराडे झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन मनकापुर फ्लायओव्हरवरून जात असताना समोरून आलेल्या शाळेच्या बसने व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात व्हॅनचा पुढील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला. व्हॅन चालकासह आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मानकापुर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
पाच विद्यार्थ्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित तीन विद्यार्थ्यांचा उपचार कुणाल रुग्णालयात सुरू आहे. गंभीर जखमी मुलीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या मनकापुर फ्लायओव्हरवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूची रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून दुसऱ्या बाजूवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघातांची मालिका घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. नागरिकांनी वारंवार अर्ज देऊनही प्रशासनाने योग्य ती सुरक्षा उपाययोजना न केल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. या अपघातासाठी बांधकाम करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरत, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. तसेच पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली.