(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपला (BJP) मीरा-भाईंदरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आणि नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मनोज राणे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढल्याचे मानले जात आहे.
मनोज राणे यांची भूमिका-
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनोज राणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “विकासाचा अजेंडा घेऊन मी शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे.”
महायुती आणि विरोधकांचे गणित-
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील, असे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार सांगितले आहे. तरीदेखील भाजपसारख्या घटक पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये संभाव्य युतीबाबत चर्चेला वेग आला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार होणार, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा सुरू आहे.