धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशासन सज्ज; नागपुरातील दीक्षाभूमीसह ड्रॅगन पॅलेस येथे विशेष तयारी

12 Sep 2025 11:29:45
 
Dhamma Chakra Pravartan Day
 (Image Source-Internet)
नागपूर :
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या (Dhamma Chakra Pravartan Day) पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या या ऐतिहासिक उत्सवात देशभरातून लाखो अनुयायी नागपूरात दाखल होणार असल्याने दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस परिसरात आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्नपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सोयी-सुविधांची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
 
शहरातील पोलिस आयुक्त रवींदर कुमार सिंगल, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इतंकर यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
बैठकीत परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे, सार्वजनिक शौचालये व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर विशेष व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. प्रशासनाने प्रत्येक भाविकाला सोयीस्कर आणि सन्मानजनक अनुभव मिळावा, यासाठी सर्व विभागांना कार्यक्षम समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारून सामाजिक क्रांतीला नवा आयाम दिल्याचा ऐतिहासिक दिवस आहे. या स्मरणार्थ दरवर्षी लाखो अनुयायी नागपूरात दाखल होतात आणि दीक्षाभूमी परिसर भाविकांच्या उपस्थितीने ऐतिहासिक उत्सवाचे केंद्रबिंदू ठरतो.
Powered By Sangraha 9.0