(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात संघर्ष उफाळला आहे. ओबीसी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत.
जरांगे यांनी थेट इशारा देत म्हटलं आहे की, “भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत, त्यांना जेलमध्ये टाका. ते मुख्यमंत्री किंवा सरकारपेक्षा मोठे नाहीत.”
सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी भुजबळांनी केली होती. मात्र, याच कारणावरून जरांगे संतप्त झाले.
ते म्हणाले, “सरकारचा आणि मराठ्यांचा रोष कुठे कमी होत होता, तो पुन्हा वाढवण्याचं काम भुजबळ करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना भुजबळांमुळे डाग लागू नये, ही सरकारची जबाबदारी आहे.”
जरांगे यांनी भुजबळांवर वैयक्तिक टीका करत त्यांना “बिनडोक” असे संबोधले. ते पुढे म्हणाले, “हेच भुजबळ सरकारने जेलमधून बाहेर आणले आणि आता तेच सरकारसाठी डोकेदुखी झाले आहेत. जर ते इतके धोकादायक ठरत असतील, तर त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवा, तेच योग्य आहे.”
जरांगे यांच्या या कठोर शब्दांमुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.