पेट्रोल लॉबी माझ्याविरोधात पेड कॅम्पेन चालवतेय;E20 फ्यूलवरुन गडकरींचं मोठं विधान

11 Sep 2025 16:34:40
 
Nitin Gadkari
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोशल मीडियावर E20 फ्यूलविरोधात उठलेल्या चर्चांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) आयोजित ऑटो रिटेल कॉन्क्लेवमध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, "E20 वर होत असलेली टीका ही कोणत्याही तांत्रिक दोषामुळे नाही. श्रीमंत आणि ताकदवान पेट्रोल लॉबीने पसरवलेल्या चुकीच्या प्रचाराचा हा भाग आहे. माझ्या विरोधात पेड कॅम्पेन राबवलं जात आहे."
 
E20 म्हणजे काय?
E20 हे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉलचं मिश्रण आहे. भारत सरकार या उपक्रमाला ग्रीन एनर्जी आणि प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानते. काही सोशल मीडिया युजर्सनी यामुळे वाहनांचं मायलेज आणि इंजिन बिघडेल असा दावा केला होता. मात्र गडकरी यांनी स्पष्ट केलं की, "हे इंधन भारताला ऊर्जा स्वावलंबनाकडे नेणार असून प्रदूषण नियंत्रणात मदत करणारं आहे." पेट्रोलियम मंत्रालयानेही यापूर्वी मायलेजबाबतच्या अफवा फोल असल्याचं सांगितलं होतं.
 
स्क्रॅपिंगमधून मिळणार मौल्यवान धातू-
गडकरींनी सांगितलं की, भारतात नवीन बॅटरी टेक्नॉलॉजीवर वेगाने संशोधन सुरू आहे. सोडियम आयन, लिथियम आयन, झिंक आयन आणि अॅल्युमिनियम आयन बॅटरीवर स्टार्टअप्स काम करत आहेत. याशिवाय जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमधून रेअर अर्थ मेटल्स आणि इतर उपयुक्त धातू मिळवता येणार आहेत.
 
सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रगती-
"पूर्वी सेमीकंडक्टर चिप्ससाठी भारत चीनवर अवलंबून होता, पण आता देशातच चिप्सची निर्मिती सुरू झाली आहे. भविष्यात बॅटरी आणि इंधन क्षेत्रातही भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होईल," असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
 
पेट्रोल-डिझेलची मागणी कायम-
गडकरींनी सांगितलं की, सध्या तरी पेट्रोल-डिझेल वाहनांची मागणी कमी होणार नाही. उलट ऑटोमोबाईल उत्पादनात दरवर्षी 15-20 टक्क्यांनी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठही मोठी आहे. मात्र पर्यायी इंधन आणि तंत्रज्ञान भविष्यात स्वतःचं महत्त्वाचं स्थान निर्माण करणार आहे.
Powered By Sangraha 9.0