(Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर (Governor) अखेर नवीन नियुक्ती झाली आहे. उपराष्ट्रपती झाल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सर्वांच्याच नजरा दिल्लीकडे लागल्या होत्या. अखेर केंद्र सरकारने निर्णय घेतला असून, सध्या गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आचार्य देवव्रत यांचा अनुभव-
आचार्य देवव्रत यांचे शिक्षण क्षेत्राशी घट्ट नाते असून, सार्वजनिक आयुष्यातील त्यांचा दीर्घ अनुभव आहे. 2015 ते 2019 या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2019 पासून ते गुजरातमध्ये राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. आता महाराष्ट्राचेही राज्यपाल म्हणून ते कार्यभार सांभाळणार आहेत.
सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड-
दरम्यान, सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली होती. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून विजय मिळवला. उपराष्ट्रपती पद स्वीकारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे राज्यपालपदावर नवीन चेहरा कोण असेल, याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, आता आचार्य देवव्रत हे गुजरातसोबत महाराष्ट्राचेही राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.