राज्यभरात अतिवृष्टीचा तडाखा; ६७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान

11 Sep 2025 17:22:08
 
Heavy rains
(Image Source-Internet) 
अकोला :
यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rains) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ६७,१६४ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून शेतकरी अजूनही मदतीची प्रतिक्षा करत आहेत.
 
मे अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच पेरणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभं राहिलं. मृगनक्षत्रातही पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी थांबवावी लागली. मात्र, जूनच्या अखेरीस आणि जुलै–ऑगस्टमध्ये अचानक मुसळधार पाऊस आणि वाऱ्यासह आलेल्या वादळाने सोयाबीन, कापूस यांसारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
 
जिल्ह्यातील ५२ पैकी १० मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये अकोला – ७७.८८ मिमी, घुसर – ८२.८० मिमी, दहीहांडा – ९९.८० मिमी, बोरगाव – ८२.८० मिमी, पळसो – ९८.५० मिमी, सांगलुड – ८२.८० मिमी, कौलखेड – ९०.३० मिमी, निंभा – १२६.३० मिमी, माना – ६७.३० मिमी आणि आलेगाव – ७४ मिमी या भागांचा समावेश आहे.

जुलै महिन्यातील अतिरिक्त नुकसान-
जुलैमध्ये झालेल्या पावसामुळेच ७,०३१ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली होती. या काळात ११,६०० शेतकऱ्यांना फटका बसला. अंदाजे ६.२१ कोटींची मदत आवश्यक असल्याचे प्रशासनाने नोंदवले असून महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद यंत्रणेच्या पथकांनी पंचनामे केले आहेत.
 
बाधित पिकांचे तपशील-
खरीप हंगामात बिगरसिंचित क्षेत्रातील ७,३०९.३४ हेक्टर जमीन प्रभावित झाली. त्यात कापूस – १८८.७ हेक्टर, सोयाबीन – ५,०५२ हेक्टर, तूर – १,३३७ हेक्टर, मूग – ३.८ हेक्टर, उडीद – ४.७ हेक्टर, इतर पिके – २२ हेक्टर आणि फळबागा – १.१९ हेक्टर यांचा समावेश आहे.
 
शेतकऱ्यांच्या मागण्या-
या आपत्तीमुळे ११,५९३ शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतात पाणी साचल्याने पिके आडवी झाली आहेत. बहुतेक शेतकरी कर्जावर शेती करत असल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, सरकारने तातडीने मदत वितरित करून त्यांना पुन्हा शेतीत उभे राहण्यासाठी आधार द्यावा.
Powered By Sangraha 9.0