(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशातील सुरक्षायंत्रणांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी धडक कारवाई करत पाच दहशतवाद्यांना (Five terrorists) अटक केली आहे. दिल्ली, मुंबई आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकून ही मोहीम राबवण्यात आली.
अटक झालेल्यांपैकी दोन दिल्ली, दोन मुंबई आणि एक झारखंडमधील रांची येथून ताब्यात घेण्यात आला. त्यांच्या ठिकाणांहून पिस्तुलं, लॅपटॉप, मोबाईल, रसायनं, सर्किट बोर्ड, वायर आणि आयईडी बनवण्यासाठी लागणारी संपूर्ण सामग्री जप्त करण्यात आली आहे.
रांचीतील गुप्त ठिकाणावरून रासायनिक आयईडी तयार करण्याचं साहित्यही पोलिसांच्या हाती लागलं आहे. प्राथमिक चौकशीत हे दहशतवादी सलग बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सध्या पाचही अटकेतील आरोपींना कसून चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात आलं असून, त्यामागील मोठं नेटवर्क आणि नियोजित लक्ष्य काय होतं याचा तपास सुरु आहे. सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत निर्णायक ठरली आहे.