(Image Source-Internet)
महिलांच्या जीवनातील मासिक पाळी (Menstruation) ही एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. पण या काळात केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. हार्मोनल बदलांमुळे शरीरात आणि मनात होणारे चढ-उतार अनेकदा तणाव, चिडचिड आणि थकवा निर्माण करतात.
तणाव का वाढतो?
हार्मोनल बदल – पाळीच्या आधी आणि दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतो. याचा थेट परिणाम मूडवर होतो.
शारीरिक वेदना – डोकेदुखी, पोटदुखी, पोटफुगी आणि अंगदुखी यामुळे मन अस्वस्थ होते.
भूक कमी होणे – या काळात काही महिलांना खाण्याची इच्छा होत नाही, तर काहींना विशेषतः गोड पदार्थ किंवा चॉकलेट खाण्याची तीव्र ओढ लागते.
निद्रानाश आणि थकवा – झोप न लागणे आणि शरीरात सतत जाणवणारा थकवा तणाव वाढवतो.
महिलांना जाणवणारे सामान्य त्रास
सुरूवातीचे दोन दिवस सर्वाधिक वेदनादायक असतात.
चिडचिडेपणा, मूड स्विंग्स आणि नकारात्मक विचार मन व्यापून टाकतात.
कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.
उपाय काय?
डार्क चॉकलेट खा – डार्क चॉकलेटमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि एंडॉर्फिन्स मूड सुधारण्यास मदत करतात आणि तणाव कमी करतात.
आरामाला प्राधान्य द्या – शक्यतो या काळात शरीराला पुरेसा आराम द्या.
हलकं-फुलकं खाणं – भूक लागत नसेल तरी आवडेल ते थोडं थोडं खा, यामुळे ऊर्जा टिकून राहते.
शांत वातावरण – ध्यान, योगा किंवा सौम्य संगीत तणाव कमी करण्यात उपयुक्त ठरते.
दरम्यान मासिक पाळीदरम्यान होणारा तणाव हा नैसर्गिक आहे. मात्र योग्य आहार, पुरेसा आराम आणि लहानसहान उपाय अवलंबल्यास हा काळ खूप सोपा आणि सहन करण्याजोगा होऊ शकतो. महिलांनी स्वतःची काळजी घेणं हाच सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे.