शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी

10 Sep 2025 18:33:06
 
Thackeray group
 (Image Source-Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dussehra gathering) घेण्याची परवानगी महापालिकेकडून मिळाली आहे. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. त्यामुळे 2 ऑक्टोबरला पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर ठाकरेंचे भाषण होणार असून, राज्यभरातील कार्यकर्त्यांची या मेळाव्यात मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
 
दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होणारा हा मेळावा यंदा अधिक गाजणार असल्याचे मानले जाते. कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट कोणती भूमिका मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चर्चेत महापालिका निवडणुकीसंबंधी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिल्याचीही चर्चा रंगत आहे.
 
या घडामोडींमुळे यंदाचा दसरा मेळावा केवळ पारंपरिक सोहळा न ठरता राजकीय समीकरणांना नवे वळण देणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Powered By Sangraha 9.0