(Image Source-Internet)
मुंबई :
कुर्डुवाडी प्रकरणानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याभोवती वादंग चांगलाच वाढला आहे. महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या वक्तव्यामुळे दादांना सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र हा मुद्दा जाणीवपूर्वक उचलून धरून अजितदादांना अडचणीत आणलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या एका ट्वीटने आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा पेटली आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, हा सगळा गोंधळ अजित पवारांच्या हिंदी व बोलण्याच्या पद्धतीमुळे झाला. पण त्याचा गैरफायदा घेत काही कार्यकर्त्यांना पुढे करून दादांची मीडिया ट्रायल रचली गेली. त्यामुळे ही अडचण कृत्रिमरीत्या उभी केली गेली, असा त्यांचा दावा आहे.
मित्रपक्षांकडून दबाव?
रोहित पवारांनी थेट महायुतीतील सहयोगी पक्षांवर बोट ठेवले. दादांच्या नावावरूनच मीडिया ट्रायल राबवली जातेय, पण शेतकरी, महिला सुरक्षा किंवा भ्रष्टाचार यांसारख्या खरी समस्या मात्र चर्चेत येत नाहीत, अशी त्यांची टीका. यामागे राजकीय गुणाकार साधण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, सुरुवातीला आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात उघडपणे भूमिका घेतली होती. पण नंतर पक्षातूनच परिस्थितीवर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रोहित पवारांनी सूचित केले. यामुळे राष्ट्रवादीच्या आतल्या गोटातही हलचल निर्माण झाली आहे.
चहापेक्षा किटली गरम-
पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवरही रोहित पवारांनी अप्रत्यक्ष टोल घेऊन असंतोष व्यक्त केला. “आपल्या नेत्यावर अन्याय होत असताना पक्षातील दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाचे नेते जर मित्रपक्षाच्या तालावर चालत कुरघोडी करत असतील, तर कार्यकर्त्यांसाठी ते निराशाजनक आहे. चहापेक्षा किटली गरम असणारे काही सहकारी असल्याने सर्व आलबेल नाही,” असा त्यांनी चिमटा काढला.
यामुळे रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अलीकडे ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सतत निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र यावेळी त्यांनी नाव न घेता शाब्दिक बाण सोडले आहेत.
या ट्वीटमुळे केवळ महायुतीतच नव्हे, तर राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचेही चित्र स्पष्ट होत असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.