सोन्याने गाठली नवी उंची; चांदीतही वाढती तेजी

10 Sep 2025 19:10:43
 
Gold, Silver
 (Image Source-Internet)
मुंबई :
गुंतवणुकीसाठी सोने (Gold) पुन्हा एकदा ‘सुरक्षित ठिकाण’ ठरले आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या भावात तब्बल ४२ टक्क्यांची झेप पाहायला मिळाली असून, त्याच काळात शेअर बाजारातील निफ्टी ५० निर्देशांक फक्त ४ टक्क्यांनी वाढला आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दराने विक्रमी स्तर गाठत नवा इतिहास रचला.
 
ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,०९,००० रुपये इतका झाला. स्थानिक मागणीतील वाढ, अमेरिकन डॉलरमधील घसरण आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा या तिन्ही घटकांचा सोन्याच्या भावावर सकारात्मक परिणाम झाला. डॉलर निर्देशांक सुमारे ०.१० टक्क्यांनी घसरल्याने इतर चलनांत सोन्याची खरेदी स्वस्त झाली व जागतिक स्तरावर मागणी वाढली.
 
विशेष म्हणजे, सोन्याच्या वाढत्या दरामागे प्रमुख कारण ठरले आहे अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता. अलीकडील आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात घटली असून बेरोजगारीचा दर ४.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक पातळी मानली जाते.
 
एलपीएल फायनान्शियलचे मुख्य अर्थविशेषज्ञ जेफ्री रोच यांच्या म्हणण्यानुसार, हे आकडे दर्शवतात की अमेरिकन रोजगार बाजार आता मंदावला असून अर्थव्यवस्था स्थैर्याकडे वाटचाल करत आहे.
Powered By Sangraha 9.0