(Image Source-Internet)
महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी परिवहन विभागाने प्रदूषण रोखण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. पुढील काळात “नो PUC… नो फ्युएल” ही मोहीम संपूर्ण राज्यात सक्तीने राबवली जाणार असून, वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय (PUC) कोणत्याही वाहनाला इंधन मिळणार नाही.
बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निर्णयानंतर राज्यातील वाहनधारकांना वेळेवर PUC काढणे बंधनकारक होणार आहे.
अंमलबजावणी कशी होणार?
योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही आणि वाहन क्रमांक स्कॅनिंग प्रणाली बसवली जाणार आहे. वाहनाचा क्रमांक स्कॅन होताच त्याचे PUC प्रमाणपत्र तपासले जाईल.
जर प्रमाणपत्र अवैध असेल तर वाहनाला इंधन देण्यास मज्जाव केला जाईल. मात्र, चालकांची गैरसोय टाळण्यासाठी पंपावरच PUC काढण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक प्रमाणपत्राला विशेष युनिक आयडी दिला जाणार आहे.
बनावट प्रमाणपत्रांवर कारवाई-
PUC प्रमाणपत्र बनावटपणे देणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे बोगस कागदपत्रांच्या गैरप्रकारांना आळा बसेल. पुढे शोरूम्स आणि गॅरेजेसमध्येही PUC प्रमाणपत्र मिळवण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रदूषण नियंत्रणाकडे महत्त्वाचे पाऊल-
राज्यातील वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर “नो PUC… नो फ्युएल” ही मोहीम प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी एक मोठे पाऊल ठरू शकते.
जरी या आदेशामुळे वाहनचालकांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी दीर्घकालीन दृष्टीने पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हा निर्णय लाभदायक ठरणार आहे.