(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी रविवारीही सुरूच राहिले. दिवसभर सरकार पातळीवर बैठकांची मालिका सुरू होती; मात्र थेट जरांगे पाटलांशी संवाद साधण्याची पावले उचलली गेली नाहीत. परिणामी, चर्चेची गाडी ठप्प राहिली.
सरकारकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे पाटलांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला. “आजवर मी पाणी घेत होतो, पण उद्यापासून पाण्याचाही त्याग करणार आहे. उपोषण आता अधिक कठोर करीन,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “चर्चा थांबली असली तरी सरकारने दारं बंद केलेली नाहीत. लवकरच अंतिम प्रस्ताव घेऊन जरांगे पाटलांशी संवाद साधला जाईल.” रविवारी रात्री महाधिवक्ता बीरेंद्र सराफ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी विशेष बैठक झाली.
आझाद मैदानात सुप्रिया सुळे यांना संतापाचा सामना-
आझाद मैदानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांना भेट दिली. मात्र, निघताना संतप्त जमावाने त्यांच्या वाहनाला घेराव घालून विरोध दर्शवला. काहींनी पाण्याच्या बाटल्याही फेकल्या.
एका बाजूला सरकार चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना, दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांचा ‘पाणीत्याग’ करण्याचा निर्णय आंदोलनाला अधिक तीव्र आणि आक्रमक रूप देतो आहे.