'पैसा नाही, आंदोलनात कसं जाऊ?' हताश तरुणाने आत्महत्या;मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी

01 Sep 2025 18:57:39
 
youth commits suicide
 (Image Source-Internet)
बीड :
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असून, राज्यभरातून मराठा (Maratha) समाज मोठ्या संख्येने ‘चलो मुंबई’च्या हाकेला प्रतिसाद देत आहे. पण बीड जिल्ह्यातील आहेरवडगाव येथील भरत खरसाडे या तरुणाला आंदोलनात सहभागी होता आलं नाही. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आणि प्रवासखर्चासाठी पैसे मिळाले नाहीत, या नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
 
घटना अशी घडली
भरत खरसाडे याला मोर्चात सहभागी होण्याची जिद्द होती. पण घरच्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे मदत करू शकले नाहीत. “सरकार जाणीवपूर्वक आरक्षणावर विलंब करतेय, मी कसा काय घरी थांबू?” असे म्हणत त्याने विष प्राशन केले. गेल्या चार दिवसांपासून बीडमधील खासगी लोटस रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
कुटुंबीयांची वेदना
“सरकारने आरक्षणावर ठोस निर्णय घ्यावा. आमचा पोटचा मुलगा गेला, आम्ही काय करायचं? आम्हाला मदत हवी,” असे शोकाकुल कुटुंबीयांनी सांगितले. भरत हा नेहमीच विविध आंदोलनं, मोर्चे आणि उपोषणात सक्रिय असायचा. मुंबई गाठता न आल्यानेच तो खचला आणि अखेर आपलं आयुष्य संपवलं.
 
सरकारला सवाल-
“आरक्षणासाठी अजून किती बळी द्यायचे आहेत?” असा तीव्र सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर मराठा समाजात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.
 
अजून एक हृदयद्रावक घटना-
फक्त दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव गावातील नितीन चव्हाण (वय 37) यानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली होती.
Powered By Sangraha 9.0