(Image Source-Internet)
नागपूर :
"पूर्व नागपूर आमदार" या बोर्डाच्या वादातून काँग्रेस (Congress) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष उफाळला आहे. काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काळीख फासल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजप नेते व माजी आमदार कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थानासमोर धडक देत घोषणाबाजी केली.
दोन्ही बाजूंतील कार्यकर्ते आमनेसामने येताच परिसरात मोठा गोंधळ उडाला. संतप्त कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण तणावग्रस्त झाले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. खोपडे यांच्या घरासमोर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स उभारण्यात आले.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, वंजारी यांनी आपल्या कार्यालयाबाहेर "पूर्व नागपूर आमदार" अशी नोंद केली होती. मात्र हे पद कृष्णा खोपडे यांच्याकडे असल्याचा भाजपचा दावा आहे. याच संतापातून भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी वंजारी यांच्या कार्यालयावर काळीख फासून निषेध व्यक्त केला होता. काँग्रेसने या कृत्याचा तीव्र विरोध नोंदवत लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खोपडे यांच्या घरासमोर आंदोलन उभारले.
अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाल्याने दोन्ही गट आमनेसामने आले आणि धुसफूस वाढली. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नसती, तर परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता होती.
या संपूर्ण प्रकारामुळे काँग्रेस-भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या राजकीय वातावरणात या घटनेनंतर नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.