मराठा आंदोलनावर पोस्ट लिहून अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अडचणीत; ट्रोलिंगनंतर इन्स्टाग्रामवरून पोस्ट हटवली

01 Sep 2025 16:24:35
 
Actress Sumona Chakraborty
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने (Sumona Chakraborty) केलेली एक सोशल मीडिया पोस्ट वादग्रस्त ठरली आहे. दक्षिण मुंबईत तिच्या गाडीला आंदोलकांनी अडवून त्रास दिल्याचा दावा सुमोनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता. “मुंबईत पहिल्यांदाच मला असुरक्षित वाटलं,” अशी भावना तिने व्यक्त केली होती. मात्र या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आणि अखेर ती पोस्ट हटवावी लागली.
 
सुमोनाने लिहिलं होतं की, कुलाबाहून फोर्टला जात असताना तिच्या कारसमोर अचानक आंदोलक जमले. गळ्यात भगवा अंगरखा घातलेला एक व्यक्ती कारच्या बोनटवर हात मारत होता, तर इतर साथीदार कारभोवती घोषणाबाजी करत होते. दोनदा अशा प्रकारचा अनुभव आला आणि पोलिस मात्र निष्क्रिय दिसले, असा आरोप तिने केला होता.
 
ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. “ही मराठ्यांची भूमी सुरक्षित आहे, तुला असं म्हणण्याचा अधिकार नाही,” असं एका युजरने म्हटलं. तर दुसऱ्याने, “मी गुजराती असूनही मला इथे भीती वाटत नाही. हे लोक त्यांच्या हक्कासाठी आले आहेत,” असा उल्लेख केला. अनेकांनी तिला पश्चिम बंगालला परत जाण्याचा सल्ला दिला. काहींनी तर “बिहारी लोक आले की काही हरकत नसते, पण मराठा आंदोलनकर्ते दिसले की तुला असुरक्षित वाटतं?” अशा शब्दांत सुमोनावर निशाणा साधला.
 
नकारात्मक प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगचा भडका उडाल्यानंतर अखेर सुमोनाने तिची वादग्रस्त पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवली. मात्र तिच्या लिखाणामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे.
Powered By Sangraha 9.0