जगदीप धनखडांचा ठावठिकाणा अद्याप गूढ; राजीनाम्यानंतर संपर्क तुटल्याने विरोधकांचा सरकारला प्रश्न

09 Aug 2025 17:08:25
 
Jagdeep Dhankhar
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी २२ जुलै रोजी प्रकृती अस्वास्थ्य कारण देत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जवळपास पंधरा दिवस उलटून गेले असले तरी ते कुठे आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते दूर असून, त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
 
राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री अमित शाह यांना उत्तरदायी धरले आहे. “धनखड कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का, याबाबत देशाला माहिती मिळाली पाहिजे. ते या राष्ट्राचे उपराष्ट्रपती होते, त्यामुळे ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही,” असे सिब्बल यांनी एक्सवरील पोस्टमधून म्हटले.
 
सिब्बल यांच्या सांगण्यानुसार, राजीनाम्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी धनखड यांच्या खासगी सचिवाशी संपर्क साधला होता. त्यावेळी ‘ते आराम करत आहेत’ असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर कोणतेही अद्यतन मिळाले नाही. “जर सरकार बांगलादेशींना शोधू शकते, तर धनखड यांचाही शोध घेऊ शकेल, असा मला विश्वास आहे,” असे सिब्बल म्हणाले.
 
धनखड यांचा कार्यकाळ प्रत्यक्षात ऑगस्ट २०२७ पर्यंत होता, पण त्यांनी दोन वर्षे आधीच पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर केली असून, २१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
 
धनखड यांच्या गायब होण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली दौर्‍यावर असताना उद्धव ठाकरे यांनीदेखील पत्रकार परिषदेत “जगदीप धनखड नेमके कुठे आहेत?” असा थेट सवाल केला.
Powered By Sangraha 9.0