रेल्वे प्रवाशांना दिलासा; सणांच्या काळात परतीच्या प्रवासावर २०% सवलत

09 Aug 2025 15:58:34

discount on return journey(Image Source-Internet) 
मुंबई :
सणासुदीच्या दिवसांत तिकिटांसाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने (Railway) प्रवाशांसाठी ‘राऊंड ट्रिप पॅकेज’ ही नवी योजना जाहीर केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या योजनेत ये-जा दोन्ही तिकिटे एकाच वेळी बुक करणाऱ्यांना परतीच्या तिकिटाच्या किमतीत २० टक्क्यांची सूट मिळेल.
 
या सवलतीसाठी तिकिटे एकाच नावावर, समान वर्गातील आणि त्याच स्थानकांदरम्यान असणे आवश्यक आहे. येण्याचा प्रवास १३ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान, तर परतीचा प्रवास १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान असावा.
 
बुकिंग प्रक्रियेत प्रथम येण्याचे तिकीट आरक्षित करावे लागेल, त्यानंतर ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’द्वारे परतीचे तिकीट घ्यावे लागेल. परतीच्या तिकिटासाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. तथापि, एकदा तिकीट काढल्यावर त्यात बदल किंवा परतावा मिळणार नाही. तसेच इतर कोणत्याही सवलती किंवा व्हाउचर्सचा या योजनेत लाभ घेता येणार नाही.
 
ही सुविधा सर्व श्रेणीतील व सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी (स्पेशल गाड्यांसह) उपलब्ध असेल. मात्र ‘फ्लेक्सी फेअर’ असलेल्या गाड्यांमध्ये ती लागू होणार नाही. तिकिटे फक्त ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवरूनच मिळतील.
 
रेल्वे प्रशासनाच्या मते, या योजनेमुळे सणांच्या काळातील प्रवासी ताण कमी होईल, प्रवास विविध दिवसांमध्ये विभागला जाईल आणि गाड्यांचा कार्यक्षम वापर होईल.
Powered By Sangraha 9.0