भाजपला विक्रोळीत मोठा धक्का; नाराज 70 कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

09 Aug 2025 17:32:32
– महापालिका निवडणुकीआधी महायुतीत खळबळ

BJP workers(Image Source-Internet) 
मुंबई :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) (एकनाथ शिंदे गट) आक्रमक मोडमध्ये आली असून, विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भाजपच्या तब्बल 70 कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या हालचालीमुळे महापालिका निवडणुकीआधी महायुतीतच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
 
विक्रोळीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी होती. स्थानिक निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना महत्त्वाची पदे दिल्याने या नाराजीला उधाण आले. अखेर भाजपच्या वॉर्ड क्रमांक 118 चे अध्यक्ष व चित्रपट नाट्य आघाडीचे महासचिव यशवंत कुटे, विक्रोळी विधानसभेतील सहकार आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळे, माजी भाजप युवा मोर्चा महामंत्री लक्ष्मण येरम यांच्यासह 70 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.
 
माजी महापौर व शिवसेना नेते दत्ता दळवी आणि माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. स्थानिक पातळीवर पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नाराज गटाने भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या मताधिक्यात आमचा मोठा वाटा होता, मात्र आमच्याच योगदानाकडे दुर्लक्ष होत आहे. बाहेरून आलेल्यांना पदे देणे हा अन्याय आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला,” असे यशवंत कुटे यांनी स्पष्ट केले.
 
या घडामोडीमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Powered By Sangraha 9.0