(Image Source-Internet)
नागपूर :
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यावर (Shalarth ID scam) अखेर राज्य सरकारने कारवाईची कास धरली आहे. शिक्षक भरतीवर २०१२ पासून बंदी असतानाही बनावट शालार्थ आयडीद्वारे हजारो बोगस नियुक्त्या झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
या तीन सदस्यीय समितीचे नेतृत्व पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार करणार असून, पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारून आतार यांचा त्यात समावेश आहे. समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.
नागपूर, नाशिक, बीड, लातूर, जळगाव आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्यांचे प्रकार समोर आले असून, फसवणुकीचे हे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या तपासात पुढील बाबींवर भर दिला जाणार आहे –
शाळांतील सर्व कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यतांची छाननी
मंजुरी प्रक्रियेत असलेल्या त्रुटींचा आढावा आणि सुधारणा
२०१२ पासूनच्या सर्व बोगस नियुक्त्यांचा शोध
दरम्यान, या प्रकरणात नागपुरात दोन गुन्हे दाखल झाले असून, २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, राज्य पोलीस विभागानेही स्वतंत्र एसआयटी तयार केली असून, उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली ती कार्यरत आहे.
या प्रकरणातून आणखी बड्या अधिकाऱ्यांचे चेहरे उघड होण्याची शक्यता असून, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट पद्धतींवर मोठा प्रहार होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.