(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी (Sanitation worker) राजू उपाध्ये यांच्या आत्महत्येनंतर आशी नगर परिसरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. मृतदेह झोन कार्यालयासमोर ठेवून कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजू उपाध्ये यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीय हवालदिल झाले असून, त्यांच्या समर्थनार्थ अनेक सामाजिक संघटनांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलनात भाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेत "दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही" असा इशारा दिला आहे.
आंदोलन स्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असले तरी आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. "मनपा प्रशासन होश में आओ" आणि "दोषींना अटक झालीच पाहिजे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की, हा लढा केवळ राजू उपाध्ये यांच्या मृत्यूपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील अन्याय, भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या शोषणाविरोधातील आहे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
या घटनेमुळे नागपूर महापालिकेतील अंतर्गत कारभारावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.