नागपुरात गुन्हेगाराचा खून; कोयता आणि बेसबॉलच्या दांडक्यांनी पुलाखाली अमानुष हत्या

07 Aug 2025 20:03:32
: राजीव गांधी नगरात पहाटेच्या सुमारास खून; संशयित फरार

Murder(Image Source-Internet) 
नागपूर :
नागपूरच्या (Nagpur) गुन्हेगारी क्षेत्राला हादरवणारी घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजीव गांधी नगर परिसरातील पुलाखाली कुख्यात गुंड समीर शेख ऊर्फ येडा शमशेर (वय ३०) याचा निर्घृण खून करण्यात आला.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समीरवर पहाटेच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत आणि बेसबॉलच्या दांडक्यांनी बेदम मारहाण करत जागीच ठार मारले. पोलिसांच्या तपासात, या हल्ल्याच्या मागे अशु नावाच्या एका स्थानिक गुन्हेगाराचा हात असल्याचा संशय आहे. अशुने आपल्या टोळीच्या मदतीने पुर्वनियोजितपणे ही हत्या घडवून आणल्याची शक्यता आहे.
 
हत्या घडण्याच्या वेळी समीर मोमिनपुरा येथील सासरी गेल्यानंतर घरी परतत होता. तो राजीव गांधी नगर पुलाखाली पोहचताच आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
 
समीर शेख याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, हत्या प्रयत्न, मारहाणीचे गुन्हे, तसेच एमपीडीए अंतर्गतही कारवाई झालेली होती. तो गांजा व अंमली पदार्थ तस्करीमध्ये देखील सक्रिय होता.
 
या हत्येनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या गुन्ह्याचं नेमकं कारण आणि पाठीमागचं संपूर्ण सत्य शोधणं ही पोलीस यंत्रणेसमोरची मोठी जबाबदारी ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0