उद्धव ठाकरे आणि मनसेची युती अखेर झाली;'ही' निवडणूक एकत्रित लढणार

06 Aug 2025 17:48:57
 
Uddhav Thackeray and MNS
 (Image Source-Internet)
 
मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) युती आता प्रत्यक्षात आली आहे. मुंबईतील बेस्ट कामगार सहकारी पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन मराठी पक्ष एकत्र आले असून, येत्या १८ ऑगस्ट रोजी ही ऐतिहासिक युती मतदारांसमोर पहिल्यांदाच सादर होणार आहे.
 
राज ठाकरे यांच्या मनसेची कर्मचारी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
 
ही युती केवळ बेस्टपुरती मर्यादित राहणार नसून, पुढे मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही तीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी मराठी कामगारांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्थानिक रोजगार आणि मराठी अस्मितेचे मुद्दे पुन्हा अधोरेखित केले आहेत.
 
महायुती सरकारवर बेस्टमधील नोकर्‍या खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, ठाकरे आणि मनसे यांनी एकत्र येऊन सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असलेला असंतोष या युतीमुळे एका सशक्त आवाजात परिवर्तित होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.
 
बेस्ट कर्मचाऱ्यांना पूर्वी मिळणारी ग्रॅज्युएटी सध्या थांबली असून, नवीन भरतीही रखडली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे थकले आहेत. या पार्श्वभूमीवर ही युती कामगारांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरू शकते, असं मत कामगार संघटनांनी मांडलं आहे.
 
कधीकाळी एकत्र असलेले आणि नंतर राजकीयदृष्ट्या दोन विरुद्ध टोकांना गेलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत. ही एकजूट केवळ राजकारणापुरती मर्यादित न राहता मराठी मतदारांसाठी नव्या आशा निर्माण करणारी ठरू शकते. या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण निर्माण होणार हे निश्चित.
Powered By Sangraha 9.0