शरद पवारांना आणखी एक जबर धक्का; माजी आमदार राहुल मोटे यांचा अजित पवार गटात प्रवेश

06 Aug 2025 14:06:08
 
Rahul Mote
 (Image Source-Internet)
धाराशिव :
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे (Rahul Mote) यांनी शरद पवार यांचा साथ सोडत थेट अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
 
आजच्या या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार गटाला गेल्या काही महिन्यांतील सलग फटके बसण्याचा क्रम कायम राहिला आहे. मोटेंबरोबरच धाराशिव, अहिल्यानगर आणि अकोला जिल्ह्यातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार गटात प्रवेश करत गळतीला अधिक गती दिली आहे.
 
‘घड्याळा’कडे झुकले मोटे-
राहुल मोटे यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या सोबत काम केले असून, त्यांचा पक्षात ठसा होता. मात्र, आता त्यांनी 'घड्याळ' चिन्ह असलेल्या अजित पवार गटात प्रवेश करून स्पष्ट संकेत दिले आहेत की, त्यांचा विश्वास आता नव्या नेतृत्वावर आहे. हा प्रवेश शरद पवार यांच्यासाठी केवळ राजकीय नाही, तर प्रतीकात्मक धक्काही मानला जात आहे.
 
स्थानिक निवडणुकांवर होणार परिणाम-
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागात अजित पवार गटाचा पायपोस अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, अशा प्रवेशामुळे अजित पवार यांचा ग्रामीण प्रभाव अधिक प्रबळ होईल आणि निवडणुकीत त्यांना स्पष्ट फायदाही मिळू शकतो.
 
शरद पवार गटावर सलग फटके-
शरद पवार यांच्या गटात गेल्या काही महिन्यांतून अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद गट), ठाकरे गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांपुढे पक्षसंघटना टिकवण्याचं आव्हान अधिकच गडद झालं आहे.
 
बार्शीमध्ये शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची गाडी जाळण्यात आलेली घटना, पक्षात असंतोषाचे लक्षण म्हणून पाहिली जात आहे. विरोधकांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यावर टीका करताना सांगितले की, “महायुतीवर सतत आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील गळती कशी थांबवायची याकडे लक्ष द्यावं.”
 
या पार्श्वभूमीवर, राहुल मोटे यांचा हा प्रवेश केवळ एक राजकीय हालचाल नसून, आगामी निवडणुकांच्या रणनीतीत मोठा बदल घडवणारा टप्पा ठरू शकतो.
Powered By Sangraha 9.0