धर्म म्हणजे जीवनमूल्यांची शिकवण; समाज उभारणीसाठी भागवत यांचे नागपूरमध्ये स्पष्ट भाष्य

06 Aug 2025 20:17:50
 
Dr Mohan Bhagwat
 (Image Source-Internet)
नागपूर :
“धर्म (Religion) म्हणजे केवळ ईश्वरपूजा नव्हे, तर तो सामाजिक जबाबदारीची आणि माणुसकीची शिकवण देणारा मार्ग आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपूर येथे ‘धर्म जागरण न्यास’च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
धर्म म्हणजे आचारधर्म, समाजधर्म –
आपल्या भाषणात भागवत यांनी धर्माच्या व्यापक परिघाची व्याख्या करत सांगितले, “धर्म हा पूजा-अर्चनेपुरता मर्यादित नाही, तर तो जीवन जगण्याची पद्धत आहे. यात व्यक्तीचे कर्तव्य, कौटुंबिक बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिष्ठा यांचा समावेश होतो.” त्यांनी स्पष्ट केले की धर्म म्हणजे जोडणं, समेट करणं आणि माणसांमध्ये एकात्मता निर्माण करणं.

धर्म पाळणारा टिकतो, तोडणारा अडचणीत सापडतो-
धर्माचे स्थान गुरुत्वाकर्षणासारखेच अटळ असल्याचे सांगत भागवत म्हणाले, “धर्माचे पालन केल्यास संकटांपासून संरक्षण मिळते. पण धर्माचा भंग केल्यास व्यक्ती आणि समाज दोघेही अडचणीत येतात.”
 
शिवाजी महाराजांचा आदर्श समोर-
छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी दाखवलेला धैर्यपूर्ण संघर्ष आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे भागवत यांनी नमूद केले. “शिवरायांचे रणशौर्य आणि धर्मनिष्ठा याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
 
जागतिक संघर्षांना धर्माच्या अभावाचे कारण-
आज जगभरातील संघर्ष, हिंसा आणि अस्थिरतेच्या मुळाशी धर्माची अनुपस्थिती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. “हिंदू धर्म हा केवळ एका समाजापुरता मर्यादित न राहता तो मानवतेचा धर्म आहे,” असे सांगत त्यांनी धर्माचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले.
 
भारतीयतेचा खरा अर्थ – विविधतेतून ऐक्य
“सर्वजण एकसारखे असावेत ही एकतेची अट नाही. मतभेद असूनही एकत्र राहण्याची ताकद भारतीय संस्कृतीत आहे. हीच खरी भारतीयता आहे,” असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
 
धर्म जागरण म्हणजे कृतीशील समाजधर्म-
धर्म जागरण केवळ ग्रंथापुरते न राहता ते आचरणात उतरवले गेले पाहिजे, असे सांगत भागवत म्हणाले, “व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत धर्माचे पालन केल्यास समाज अधिक सशक्त आणि सुसंस्कृत बनेल.”
 
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, “धर्म टिकला, तर समाज टिकेल आणि समाज मजबूत झाला, तर राष्ट्रही शक्तिशाली बनेल.”
Powered By Sangraha 9.0