(Image Source-Internet)
नागपूर :
सहकार नगर परिसरातील बिनपरवाना चिकन-मटन विक्री केंद्रांवर कारवाई होत नसल्यामुळे संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) थेट नागपूर महापालिकेच्या झोन-एक कार्यालयात धडक दिली. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना जिवंत कोंबड्यांची भेट देत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिक या अवैध बाजाराविरोधात तक्रारी करत होते, मात्र महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने, राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी आणि शहर उपाध्यक्ष तुषार गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक आयुक्त चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मनसेने निवेदनात अवैध विक्रेत्यांमुळे परिसरात निर्माण झालेली दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास, अपघातांची संख्या आणि एका महिलेचा मृत्यू यांसारखे गंभीर मुद्दे मांडले. विक्रेत्यांची ओळख, परवानगी आणि नागरी दस्तऐवज यांचा अभाव असल्याकडेही लक्ष वेधले.
शिष्टमंडळाने प्रशासनाला थेट इशारा दिला की, जर हे मार्केट लवकरच हटवले गेले नाही, तर आम्हीच झोन कार्यालयाबाहेर अशा प्रकारचा बाजार भरवू. यावर सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांचा सहभाग-
या आंदोलनात वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे, विभाग अध्यक्ष हर्षल दसरे, महिला आघाडीच्या रोशनी खोब्रागडे, प्रिया बोरकुटे, गुंजन पांगुळ, कुंदा मानकर, चेतन शिराळकर आणि रामोजी खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनसेच्या या 'कोंबडी भेट' आंदोलनाने महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात वेगळ्या प्रकारे आवाज उठवला असून, आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.