‘लाडकी बहीण’ योजनेच्या खर्चामुळे ‘आनंदाची शिधा’ बंद; गोरगरिबांवर परिणाम

06 Aug 2025 11:33:37
 
Chhagan Bhujbal
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bhaeen scheme) योजने मुळे इतर योजनांवर वित्तीय ताण पडू लागला असून, त्याचा फटका थेट राज्यातील गरीब कुटुंबांवर बसण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा देण्यात येणार नसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
 
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सरकारला दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असून, त्या खर्चासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागांच्या निधीतून अर्थसहाय्य घेण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे इतर योजनांची अंमलबजावणी अडथळ्यात आली आहे.
 
दरवर्षी गरजूंसाठी दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून राबवला जातो. मात्र, सध्या तिजोरीवर असलेला ताण लक्षात घेता ही योजना तात्पुरती थांबवावी लागल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलं. "राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर या योजनेचा फेरविचार केला जाईल," असं आश्वासन त्यांनी दिलं.
 
ही योजना यंदाच स्थगित राहणार की पूर्णपणे बंद होणार, याबाबत सरकारकडून ठोस निर्णय अजूनही जाहीर झालेला नाही. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिवाळीत आधार मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
विरोधकांनी या निर्णयावर टीका करताना म्हटले की, "एका लोकप्रिय योजनेसाठी इतर जनकल्याणकारी योजना बंद करणं म्हणजे आर्थिक नियोजनातील अपयश आहे."
 
सद्याच्या परिस्थितीत सरकारकडून खर्चात बचत करत योजनांचा पुनरावलोकन सुरू असून, अनेक योजना मर्यादित स्वरूपात राबवण्याचा विचार सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0