(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
महाराष्ट्रात सध्या राजकीय हालचालींना गती मिळाली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde) यांच्या दिल्ली भेटीने या घडामोडींना अधिकच उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संबंधांवर चर्चांचा मारा सुरु असताना, शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले.
शिंदे यांनी या भेटीचं वर्णन "सदिच्छा भेट" असं केलं असलं तरी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलं आहे. "एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचं गृहमंत्री म्हणून केलेल्या कार्याचं विशेष कौतुक केलं. त्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी दिल्लीत आलो," असं शिंदे म्हणाले.
या भेटीत शिंदे गटाचे खासदारही सहभागी होते. सामूहिक बैठकीनंतर शिंदे आणि शहा यांच्यात खासगी चर्चा झाल्याचं त्यांनी उघड केलं. या चर्चेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची तयारी, युतीतील समन्वय आणि भविष्यातील रणनीतीवर विचारविनिमय झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीला यश मिळेल, याबाबत आम्ही आशावादी आहोत. अमित शहा यांचाही प्रतिसाद सकारात्मक होता," असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
या भेटीनंतर दिल्लीतील राजकीय वातारणात शिंदेंच्या भूमिकेबाबत नवे संकेत मिळाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीची रणनीती अधिक ठोस होत असल्याचं चित्र दिसत आहे.