सीताबर्डी टनेलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; तात्पुरती स्थगिती नाकारली

05 Aug 2025 18:09:02
 
Nagpur bench HC
(Image Source-Internet) 
नागपूर :
नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सीताबर्डी टनेल (Sitabardi Tunnel) प्रकल्पावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सध्या अडथळा निर्माण होणार नाही.
 
न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
 
पर्यावरण कार्यकर्ते जयदीप दास यांनी या प्रकल्पाविरोधात हस्तक्षेप अर्ज सादर करत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले आणि प्रकल्प थांबविण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा तात्पुरती स्थगिती देण्याचा आग्रह फेटाळला आहे. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
 
सीताबर्डीतील मानस चौक ते सिव्हिल लाईन्समधील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चौक या मार्गावर हा टनेल तयार करण्यात येणार असून शहरातील वाहतूक दाटी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
 
या प्रकरणात अ‍ॅड. कुलदीप महाले यांची अ‍ॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते न्यायालयाला या प्रकरणात मार्गदर्शन करत आहेत.
Powered By Sangraha 9.0