महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह काँग्रेसला मोठा झटका; बडे नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

05 Aug 2025 17:33:03
 
BJP
 (Image Source-Internet)
धाराशिव  :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः वसई-विरार आणि धाराशिव परिसरात भाजपने (BJP) मोठी राजकीय खेळी खेळली असून, ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना जबर धक्का बसला आहे.
 
वसई-विरारमध्ये भाजपचा ‘पॉवर प्ले'-
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. आमदार स्नेहा दुबे पंडीत यांच्या पुढाकाराने या दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी थेट भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे स्थानिक राजकारणात मोठा उलथापालथ झाली असून भाजपची ताकद वाढली आहे.
 
आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे आणि बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी औपचारिकरित्या भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये ठाकरे गटाचे शहर समन्वयक निलेश भानुसे, युवासेनेचे तालुका अधिकारी सुनील मिश्रा, उपतालुकाप्रमुख प्रकाश देवळेकर, वैभव म्हात्रे आणि योगेश भानुसे यांचा समावेश आहे.
 
तसेच, बहुजन विकास आघाडीचे संतोष घाग, संतोष कनोजिया यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे वसई-विरारमध्ये ठाकरे गट आणि बीव्हीए दोघांचीही घसरगुंडी झाली असून भाजपला स्थानिक स्तरावर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
 
धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का-
धाराशिव जिल्ह्यातही भाजपने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश विश्वनाथराव आष्टे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
 
प्रकाश आष्टे हे धाराशिवच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा मजबूत चेहरा मानले जात होते. त्यांनी अनेक वर्षे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केलं होतं. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या गडाला सुरुंग लागल्याचं बोललं जात आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
दरम्यान राजकीय विश्लेषकांच्या मते, या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपने निवडणुकीपूर्वीच दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्याची रणनीती आखली आहे. एकीकडे विरोधकांमध्ये फूट पडताना दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या हालचाली अधिक आक्रमक होत चालल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0