- सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार
(Image Source-Internet)
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली ‘महादेवी’ हत्तीण (Mahadevi elephant) अखेर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील या हत्तीला वनतारामध्ये हलवण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि भक्तांनी तिला पुन्हा परत आणण्याची जोरदार मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकारने महादेवी हत्तीच्या बाबतीत मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्य सरकार आणि मठ दोघं मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, "महादेवी ही गेल्या ३४ वर्षांपासून नांदणी मठात आहे. तिच्या काळजीसाठी सरकार डॉक्टरांची विशेष टीम तयार करणार आहे. मठाच्या भावना आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकार पूर्ण ताकदीने मठाच्या पाठीशी उभं आहे."
डॉक्टरांचे पथक तैनात होणार
महादेवी हत्तीची योग्य काळजी घेण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाला आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकारकडून दिलं जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
लोकभावनेचा सरकारकडून सन्मान
या मुद्द्यावर खासदार धैर्यशील माने यांनी देखील प्रतिक्रिया दिली. "महादेवी हत्तीच्या प्रकरणात राज्य सरकारने जनभावनेचा आदर राखून निर्णय घेतला आहे. मठाच्या भावना आणि लोकभावना महत्त्वाच्या आहेत. हत्ती पुन्हा नांदणी मठात यावा ही सर्वांची अपेक्षा आहे," असं माने यांनी सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशानंतर महादेवी हत्तीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलं होतं. मात्र, स्थानिकांनी आणि भक्तांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलनही करण्यात आलं.
आता राज्य सरकारने मध्यस्थी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने महादेवी हत्तीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.