मुंबईतील कबुतरखान्यांबाबत सरकारचा नवा निर्णय; अचानक बंदीवर मुख्यमंत्र्यांचा आक्षेप

05 Aug 2025 14:03:07
 
CM Devendra Fadnavis
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुंबईतील कबुतरखान्यांवर निर्माण झालेला वाद अखेर थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis) यांनी पुढाकार घेतला आहे. कबुतरखाने अचानक बंद केल्याने नागरिक आणि कबुतरप्रेमींमध्ये अस्व(स्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
 
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, आमदार गणेश नाईक आणि मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही. आरोग्याच्या दृष्टीने काही चिंता असल्या, तरी त्याबाबत सखोल वैज्ञानिक अभ्यास आवश्यक आहे.
 
नवीन नियम आणि विशेष तंत्रज्ञानाचा वापर-
कबुतरांना खाऊ घालण्यास ठराविक वेळ निश्चित करून ‘नियंत्रित फिडिंग’ची अंमलबजावणी करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सुचवले. तसेच, कबुतरांच्या विष्ठेमुळे निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या समस्येवर उपाय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. टाटा समूहाने तयार केलेल्या स्वच्छता मशीनचा यासाठी वापर होणार आहे.
 
सरकारची उच्च न्यायालयात भूमिका ठाम-
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका कबुतरखान्यांच्या बाजूने भक्कम भूमिका मांडतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही या मुद्यावर सरकार आपली बाजू मांडण्यास तयार आहे.
 
कबुतरप्रेमींना दिलासा, नागरिकांचाही विचार-
बैठकीनंतर आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, ज्या कबुतरखान्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती, त्या पुन्हा सुरू करण्यात येतील. लवकरच एक समिती नेमून नियमांचे पालन सुनिश्चित केले जाईल. यामुळे कबुतरप्रेमींनाही दिलासा मिळणार असून, नागरिकांच्या आरोग्याचाही विचार करण्यात येणार आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या या हस्तक्षेपामुळे कबुतरखान्यांवरील अनिश्चितता दूर झाली असून, लवकरच सर्वसमावेशक आणि समाधानकारक निर्णय लागू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0