(Image Source-Internet)
अहिल्यानगर :
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) शेतकरी मेळाव्यात मोठा गोंधळ झाला. भाषणादरम्यान कांद्याच्या दराचा उल्लेख न केल्याने संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना ताब्यात घेतले.
कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी संघटनेची आहे. काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये राष्ट्रवादी युवक नेत्याकडून संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाला मारहाण झाल्याने आधीच नाराजी होती. त्यात आता श्रीगोंद्यातील घटनेमुळे पवारांविरोधातील संताप अधिकच उफाळून आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांना चपराक बसल्याची घटना ताजी असतानाच अजित पवारांच्या सभेत घडलेला हा प्रकार जिल्ह्याच्या राजकीय वातावरणाला चांगलाच तापवून गेला आहे.