सरकार झुकलं;मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक दिवसाची वाढ

30 Aug 2025 10:58:50
 
Manoj Jarange Patil
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाला दिलेली परवानगी गुरुवारी संपली होती. मात्र दिवसभर सुरू राहिलेल्या गोंधळ, वाहतूक कोंडी आणि कायद्याचे उल्लंघन याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर उशिरा रात्री मुंबई पोलिसांनी आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
 
परवानगी संपली पण तातडीने वाढवली-
पोलिसांनी दिलेल्या सुरुवातीच्या परवानगीचा कालावधी गुरुवारी संपल्यानंतर मोठी अनिश्चितता निर्माण झाली होती. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर शुक्रवारीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावेळी काही कठोर अटी व नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
सदावर्तेंची आक्रमक मागणी-
दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांनी उच्च न्यायालयाच्या नियमावलीचे पालन केले नाही, असा आरोप केला आहे. त्याचबरोबर त्यांना तातडीने अटक करण्याची मागणीही केली आहे. त्यामुळे आंदोलनाभोवतीचा वाद आणखी तीव्र झाला आहे.
 
आंदोलक वाशीच्या दिशेने-
आझाद मैदानात दिवसभर उसळलेली गर्दी संध्याकाळनंतर थोडी ओसरली. अनेक आंदोलक वाशीच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्या मुक्कामाची सोय तिथे करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील तणाव आंशिकपणे कमी झाला असून, ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूकही पूर्ववत झाली आहे.
 
उद्याही होणार मोठी गर्दी-
जरी काही आंदोलक परत गेले असले तरी मनोज जरांगे पाटलांनी मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं जाहीर केल्याने उद्याही आझाद मैदानात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0