शेवटी तुमचंच तोंड भाजून जाईल; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा टोला

    30-Aug-2025
Total Views |
- मराठा-ओबीसी आरक्षणावरून पलटवार

Uddhav Thackeray CM Fadnavis(Image Source-Internet) 
 मुंबई :
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, "सकाळी काही लोकांची विधाने ऐकली. ते नक्की काय साध्य करू पाहतात, हे माझ्या लक्षात आलं आहे. अशा आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी तुमचंच तोंड भाजून जाईल," असा टोला त्यांनी लगावला.
 
"मराठा समाजाला न्याय आम्हीच दिला"
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "गेल्या दहा वर्षांत मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आमच्याच सरकारने केलं. आरक्षण देण्यापासून ‘सारथी’ची स्थापना, अण्णासाहेब पाटील महामंडळाची अंमलबजावणी – हे सगळं आम्हीच केलं."
 
"ओबीसी-मराठा भिडवण्याचा प्रयत्न"
फडणवीसांनी पुढे इशारा दिला की, "काही जण मुद्दाम प्रयत्न करत आहेत की मराठा-ओबीसी समाजात संघर्ष पेटावा. पण आमचं धोरण वेगळं आहे. आम्ही दोन्ही समाजांना न्याय देणार आहोत. सामाजिक सलोखा जपणं हेच आमचं कर्तव्य आहे. लोकांना एकमेकांवर उभं करणं, भिडवणं – हे या सरकारचं धोरण नाही."
 
फडणवीसांच्या या विधानामुळे ठाकरे-फडणवीस यांच्यातील शब्दयुद्ध अजून पेटण्याची चिन्हं आहेत.