तक्रारीत वेळ वाया घालवू नका,थेट तयारीला लागा;अजितदादांचा इशारा

30 Aug 2025 16:53:00
 
Ajit Pawar
 (Image Source-Internet)
पुणे :
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असून दिवाळीनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी गतीमान केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आदेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
 
अजितदादांसाठी प्रतिष्ठेची लढाई-
मुंबई महापालिकेनंतर पुणे महानगरपालिका ही राज्यातील सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. अजित पवारांसाठी ही पालिका ‘प्रतिष्ठेचा प्रश्न’ ठरली असून ते आतापासूनच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश देऊन निवडणुकीचा सूर लावला आहे.
 
न्यायालयात धाव घेऊ नका-
पुणे पालिकेच्या प्रभागरचनेवर भाजप आणि शिंदे गटाला लाभ मिळेल असे आरोप कार्यकर्त्यांकडून झाले. मात्र, अजितदादांनी यावर ठाम भूमिका घेत कार्यकर्त्यांना आदेश दिला.प्रभागरचनेवर तक्रारी करून वेळ वाया घालवू नका. आपण न्यायालयात जाणार नाही. सरळ निवडणुकीच्या कामाला लागा.”
 
स्वबळावर लढण्याचे संकेत?
या बैठकीत अजित पवारांनी दिलेला आणखी एक आदेश खळबळजनक ठरला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.पदाधिकाऱ्यांनी सर्वच जागांसाठी तयारी ठेवावी.यातून पुणे पालिका निवडणूक महायुतीसोबत की स्वबळावर, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महायुतीला पहिला धक्का?
अजितदादांच्या या भूमिकेमुळे महायुतीत नवे समीकरण घडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुण्यातील निवडणुकीत अजित पवार स्वबळाचा नारा देऊन महायुतीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
 
आता पुणे पालिकेची लढाई ‘महायुती विरुद्ध अजितदादा’ अशी रंगणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0