बीड सरपंच हत्या प्रकरण : वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

    30-Aug-2025
Total Views |
 
Valmik Karad Bail
 (Image Source-Internet)
 
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडच्या (Valmik Karad) सुटकेची शक्यता संपुष्टात आली आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
 
मागील सुनावणीत कराडच्या वकिलांनी तब्बल तीन तास युक्तिवाद करून त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद मान्य न करता जामीन नाकारला. त्यामुळे कराडचा तुरुंगवास आणखी वाढणार आहे.
 
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीडसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचं पडसाद विधिमंडळापर्यंत उमटले. एवढंच नव्हे, तर या हत्येनंतर तत्कालीन मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
म्हणजेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसाठी तुरुंगाचे दरवाजे अद्याप बंदच राहणार आहेत.