उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

    29-Aug-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 (Image Source-Internet)
मुंबई :
इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी रेड्डींना पूर्ण पाठिंबा देत लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे हीच खरी गरज असल्याचे स्पष्ट केले.
 
“उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही आधीच्या उपराष्ट्रपतींच्या अचानक राजीनाम्यानंतर होत आहे. इंडिया आघाडी ही लढत एकदिलाने लढत आहे. आमचे उमेदवार रेड्डी साहेब हे नेहमी संविधानाशी प्रामाणिक राहून काम करणारे नेते आहेत. आज देशाला न्यायबुद्धी आणि विवेकबुद्धी जपणारे उपराष्ट्रपती हवेत,” असे ठाकरे म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, “संख्याबळ अपुरं असलं तरी मतदान गुप्त असतं. देशप्रेम मनात असलेले खासदार, मग ते कुणाच्याही पक्षाचे असोत, ते राष्ट्रहितासाठी मतदान करू शकतात. लोकशाही टिकवण्याच्या उद्देशानेच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.”
 
दरम्यान, एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना समर्थन द्यावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. “माझा पक्ष फोडला, माझे आमदार पळवले आणि आता त्याच लोकांचा पाठिंबा मागत आहेत! ही मागणीच विचित्र आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणी मागणी न करताही आम्ही पाठिंबा दिला होता.
पण ‘गरजेपुरते वापरा आणि नंतर फेकून द्या’ या पद्धतीला आम्ही मान्यता देणार नाही,” असे ठाकरे म्हणाले.
 
ठाकरे यांच्या या भाष्यामुळे उपराष्ट्रपती निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.