(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा (Maratha) बांधव आज मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदान रणांगण बनले आहे. जरांगे यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ पाच हजार जणांना परवानगी होती. मात्र मैदानाबाहेरही प्रचंड जनसमुदाय जमल्याने संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला आहे. “एक मराठा, लाख मराठा” या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले.
मुंबईत सर्वत्र भगव्या टोपींचा सागर-
सीएसएमटी, दादर, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी अशा महत्त्वाच्या ठिकाणी भगव्या टोप्या घातलेले आंदोलक सर्वत्र दिसत आहेत. लोकल गाड्यांतून मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाकडे रवाना झाले. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीएसएमटीवर पोलिसांची ‘गांधीगिरी’
सीएसएमटी परिसरात एकवेळ मोठी गर्दी जमली. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांशी थेट टोकाची भूमिका न घेता अनोख्या पद्धतीने संवाद साधला. त्यांनी मनोज जरांगे यांचा व्हिडिओ कॉल दाखवत – “दादांचं ऐकायचं नाही का?” असा प्रश्न आंदोलकांना विचारला आणि संयम पाळण्याचे आवाहन केले. या ‘गांधीगिरी’मुळे गर्दी काही प्रमाणात नियंत्रीत झाली.
जरांगे यांची पोलिसांना हमी-
आंदोलनाची परवानगी घेण्यापूर्वीच जरांगे यांनी पोलिसांना आश्वासन दिले होते की, कोणत्याही आंदोलकाकडे शस्त्र नसेल, कुणी भडकावू भाषा वापरणार नाही, तसेच सरकारी संपत्तीचे नुकसान होणार नाही. धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल.
चूक झाली तर माझ्यावर गुन्हा दाखल करा-
जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले की, आंदोलन शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी स्वतःची आणि आयोजकांची असेल. काही गडबड झालीच, तर गुन्हा माझ्यावर नोंदवा, असे त्यांनी पोलिसांना लेखी दिले आहे.
मुंबईत आजचा दिवस संपूर्णपणे मराठा आरक्षण आंदोलनाच्या रंगात रंगला असून, शासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.