मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मनोज जरांगे (Jarange) पाटील यांच्या आमरण उपोषणाने आज आझाद मैदान दणाणून गेलं. “आरक्षणाशिवाय माघार नाही” या निर्धारामुळे आंदोलनाला मोठं बळ मिळालं असून हजारो मराठा बांधव मैदानात आणि बाहेर रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
बीडच्या दोन आमदारांची भेट-
उपोषण सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात बीड जिल्ह्याचे आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाशदादा साळुंके आझाद मैदानात पोहोचले. त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून ठाम समर्थन व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला हक्काचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली.
काँग्रेस खासदारांची सरकारवर टीका-
नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनीही या आंदोलनात सहभागाची घोषणा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, “सरकार जाणूनबुजून विलंब करत आहे. आंदोलन हा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,” असा इशारा दिला.
मैदानाबाहेरही लोटली गर्दी-
मोठ्या संख्येने आलेल्या समाजबांधवांमुळे आझाद मैदान पूर्ण भरलं असून, हजारो आंदोलक बाहेरच्या रस्त्यांवर थांबले आहेत. परिणामी संपूर्ण परिसर मराठा समाजाच्या लाटेत रंगून गेला आहे.
नाशिककडून ताफ्यांचा ओघ-
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून शेकडो वाहनांचे ताफे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलनासाठी लागणारी रसदसुद्धा नाशिकहून पुरवली जात आहे.
‘ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण’ आणि ‘सगेसोयरे अध्यादेश’ या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे. उपोषणाला वाढता लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत असल्याने, राज्य सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचं दडपण आणखीनच वाढलं आहे.