प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत;मोहन भागवत यांचा लोकसंख्या धोरणावर मोठा दावा

29 Aug 2025 12:49:03
 
Mohan Bhagwat
 (Image Source-Internet)
नागपूर:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित ‘संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज’ या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पत्रकार परिषदेत लोकसंख्या धोरणावर आपले मत मांडले.
 
भागवत यांनी म्हटले, “‘हम दो हमारे तीन’ असे धोरण असावे, ‘हम दो हमारे दो’ नाही. प्रत्येक कुटुंबात तीन मुले असणे आवश्यक आहे.” त्यांनी याबाबत पुढे सांगितले की, “ज्यांचा जन्मदर ३ पेक्षा कमी आहे, ते हळूहळू कमी होत जातात. जगातील धर्मग्रंथांमध्येही असे नमूद आहे.”
 
भागवत म्हणाले की, डॉक्टरांच्या मते, उशीर न करता लवकर विवाह करणे आणि तीन मुले होणे पालक व मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, तीन मुले असल्यास मुलांना आपापसातील अहंकार आणि भांडणे यावर नियंत्रण येते.
 
ते म्हणाले, “भारताची सरासरी जन्मदर २.१ आहे, गणितानुसार २.१ म्हणजे जवळजवळ तीन. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात तीन मुले असण्याचा विचार करावा. परंतु तीन मुलांचा खर्च वाढतो, त्यामुळे यापेक्षा जास्त मुले होऊ नयेत, हा मुद्दा सर्वांनी मान्य करावा.”
 
भागवत यांनी विशेषतः हिंदू समाजाचा जन्मदर कमी होत असल्याचेही सांगितले आणि नवीन पिढीने तीन पेक्षा कमी मुले न होऊ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
Powered By Sangraha 9.0