नागपूरच्या जेलमधून १८ वर्षांनंतर सुटणार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

28 Aug 2025 22:12:27
 
Arun Gawli
 (Image Source-Internet)
नागपूर :
अंडरवर्ल्ड डॉन आणि शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी (Arun Gawli) याला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळी यांची प्रलंबित याचिका, त्यांचे वय (७६ वर्षे) आणि आतापर्यंतचा कारावास लक्षात घेऊन हा निर्णय दिला.
 
गवळी मागील १८ वर्षांपासून नागपूर केंद्रीय कारागृहात शिक्षा भोगत आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांची तात्पुरती सुटका होणार असून, प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.
 
खटल्याचा आढावा
२००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांना अटक करण्यात आली होती.
 
ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेप आणि १७ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
 
गवळी यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र ९ डिसेंबर २०१९ रोजी उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
 
वाढते वय आणि दीर्घकाळापासून शिक्षा भोगत असल्याचे कारण देत गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.
 
सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटींवरच गवळी यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल १८ वर्षांनंतर नागपूरच्या जेलमधून गवळी बाहेर पडणार आहेत.
Powered By Sangraha 9.0