आरक्षणावर कुठलीही तडजोड नाही;राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला

28 Aug 2025 22:08:39
 
OBC vs Maratha
 (Image Source-Internet)
नागपूर :
मराठा (Maratha) आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा झेंडा हाती घेतल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजातही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी नागपूरमध्ये ओबीसी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. संघाने स्पष्ट इशारा दिला की, "ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणावर गदा आणली, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल."
 
ही बैठक ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी झाली. यात जरांगे पाटील यांच्या मागण्यांबरोबरच ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी पुढील आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली.
 
तायवाडे म्हणाले,
"आज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बैठक घेतली असून उद्यापासून जिल्हानिहाय पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जागृती केली जाईल. परवा नागपूरच्या संविधान चौकात क्रमिक उपोषण सुरू केले जाईल. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने व धरणे घेण्यात येतील. गरज पडल्यास मोठ्या संख्येने मुंबई गाठली जाईल. १५ तारखेपासून मुंबईकडे आंदोलनाची दिशा वळवली जाईल."
 
सरकारच्या भूमिकेचा उल्लेख करत तायवाडे म्हणाले,
"मुख्यमंत्र्यांनी ओबीसींसाठी १० टक्के आरक्षणावर ठाम भूमिका घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, सरकारने आंदोलकांच्या दबावाखाली न झुकता ठाम राहणे गरजेचे आहे. ओबीसी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. हे हक्क मिळवण्यासाठी लढणे अपरिहार्य आहे."
 
तायवाडे यांनी विधानसभेतील ओबीसी आमदारांना देखील थेट आवाहन केले.आज सभागृहात ९० पेक्षा जास्त ओबीसी आमदार आहेत. त्यांनी आपल्या समाजासाठी ठाम उभे राहायला हवे. सरकारने आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य कराव्यात, अन्यथा ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल.राज्यातील राजकारणात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0