(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटला असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज रात्री मुंबईत दाखल होत आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) होणाऱ्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐतिहासिक गर्दी उसळण्याची शक्यता वर्तवली जात असून, यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
शिवनेरी ते आझाद मैदान – मोर्चाचा प्रवास
मोर्चाने काल जुन्नर येथे मुक्काम केला. आज सकाळी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केले. मार्गात अहिल्यानगर येथे समाज बांधवांशी संवाद साधण्याचे नियोजन असून, हजारोंच्या संख्येने आंदोलक या यात्रेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
मुंबईत पोहोचलेल्या मराठा बांधवांच्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला ओबीसी आणि मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या चळवळीमधून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.
पोलिसांची अटी आणि आंदोलनाचा निर्धार-
मुंबई पोलिसांनी आंदोलनास मंजुरी दिली असली तरी त्यासाठी २० अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात मैदानात स्वयंपाक करण्यास मनाई, कचरा टाकण्यास बंदी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास परवानगी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आझाद मैदानावर केवळ ५,००० आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे, मात्र बाहेरून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज एकवटत असल्याने तणाव वाढू शकतो.
फक्त एका दिवसाची परवानगी मिळाल्यानेही मनोज जरांगे यांनी हार मानलेली नाही. ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत.
राजकीय वर्तुळात हलचल-
मुंबईतील दादर परिसरात राजकीय बॅनरबाजी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचे श्रेय देणारे बॅनर भाजप नेत्यांच्या नावावर लावले गेले आहेत. “इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” अशा आशयाचे संदेश लावल्याने राजकीय वातावरणात चांगलाच रंग चढला आहे.