गोळ्या घातल्या तरी हटणार नाही; मनोज जरांगे पाटीलांचा फडणवीसांना इशारा

28 Aug 2025 14:12:30
 
Manoj Jarange Patil
 (Image Source-Internet)
पुणे :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमक झाले आहेत. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.
 
जरांगे म्हणाले, "ते वारंवार माझ्या समाजाचा आणि माझा अपमान करतात. जाणूनबुजून करतात. कारण मी मॅनेज होत नाही. पण मी हटणार नाही. तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार आहे. आता मात्र मागे हटणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
 
ते पुढे म्हणाले, "मी पुन्हा पुन्हा सांगतो की बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. मराठ्यांच्या नाराजीची लाट पुन्हा तुमच्याविरोधात गेली, तर तुमचं राजकीय करिअर संपवणारी ठरेल."
 
फडणवीसांना थेट आवाहन करताना जरांगे म्हणाले, "तुम्हाला ही योग्य संधी आहे. गोरगरीब मराठ्यांची मनं जिंका. तुम्ही आरक्षणाची अंमलबजावणी केलीत, तर मराठे आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाहीत. आम्ही काही तुमचे वैरी नाहीत. फक्त तुमची आडमुठी मराठाविरोधी भूमिका सोडा आणि मोकळ्या मनाने निर्णय घ्या. आम्ही दिलेला शब्द बदलणार नाही. आम्ही फक्त लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहोत."
 
एका दिवसाच्या उपोषण परवानगीबाबतही त्यांनी सरकारला प्रश्न केला. "असं होऊच शकत नाही. मग एका दिवसात मागण्या मान्य करा. उपोषणासाठी एका दिवसाची परवानगी कशी देता? जर तुम्हाला वेळ कमी आहे, तर मग मागण्या एका दिवसातच मान्य करा," अशी टीका जरांगे यांनी केली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0