(Image Source-Internet)
मुंबई :
राजकारणात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गाने जाणारे ठाकरे बंधू (Thackeray brothers) गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. बुधवारी सकाळी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं.
राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. यंदा राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून गणपती दर्शनासाठी आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह शिवतीर्थवर दाखल झाले. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी एकत्र जेवणार आहेत.
अलीकडेच २७ ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते. अनेक वर्षांनी त्यांनी मातोश्रीवर भेट दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही बंधूंमध्ये मनधरणी होत असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या घरी गेले होते, त्यानंतर आता उद्धव यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पाऊल ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये आता खऱ्या अर्थाने जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी दादरच्या कृष्णकुंजऐवजी नव्या शिवतीर्थ या निवासस्थानी वास्तव्य सुरू केले. याठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची वर्दळ होत असली तरी उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीच आले नव्हते. अखेर गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले आणि ठाकरे बंधूंच्या नात्यात नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.