महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे शिवसेनेत

    27-Aug-2025
Total Views |
 
Ravindra More
 (Image Source-Internet)
अहिल्यानगर :
महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठी राजकीय घडामोड घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे (Ravindra More) यांनी संघटनेपासून वेगळं होत शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
 
या हालचालीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना मोठा धक्का बसला असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं बदलण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
 
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक लढा-
रवींद्र मोरे हे ऊसदर, वीजदर, हमीभाव आणि दुष्काळग्रस्तांना मदत अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून परिचित आहेत. अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला होता. त्यांच्या नेतृत्वामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात चांगलं बळ मिळालं होतं. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेट्टींपासून वेगळा मार्ग स्वीकारला.

शिवसेनेत नवीन जबाबदारी-
शिवसेनेत प्रवेशानंतर पक्षाने मोरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना शेतकरी सेना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यात नवं बळ मिळणार असून, दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना नेतृत्वविहीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
राजकीय तज्ञांच्या मते, मोरे यांचे आगमन हे शिंदे गटासाठी मोठे यश आहे. तर या हालचालीमुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुका अधिक चुरशीच्या होणार हे निश्चित आहे.