मराठा आरक्षण प्रश्न तापला; सरकारचे दोन मंत्री जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना

27 Aug 2025 15:59:39
 
Jarange
 (Image Source-Internet)
मुंबई:
मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पुन्हा पेट घेत आहे. मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून, यामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या मुंबईत आगमनाने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या शक्यतेमुळे सरकार आता सक्रिय झाले आहे.
 
जरांगे मुंबईकडे, समर्थकांचा घोषणाबाजीसह कूच
जरांगे आपल्या समर्थकांसह भगवे झेंडे हातात घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करण्याची जबाबदारी दिली आहे. हे दोन्ही नेते जरांगे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन न करण्याची विनंती करणार आहेत.
 
चर्चेची उत्सुकता शिगेला
ही महत्वाची बैठक अहिल्यानगर किंवा पुण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री उदय सामंत लवकरच अहिल्यानगरमध्ये पोहोचणार असल्याचे कळते. सरकारकडून जरांगेंना नेमका काय पर्याय किंवा आश्वासन दिलं जाणार? जरांगे आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहणार की सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
Powered By Sangraha 9.0